मुंबई : रतन टाटा यांच्या निधनानंतर सारा देश हळहळला. देशाच्या या जेष्ठ उद्योगपतीने बुधवारी (दि.9) रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती टाटा समूहाचा नवा उत्तराधिकारी कोण असणार या विषयाची. अखेर या चर्चेला थांबा मिळाला आहे. टाटा समूहाचा नवा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे. टाटा ट्रस्टच्या संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असणार आहेत. रतन टाटा हे 1991 पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळवून दिली. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची जबाबदारी आता नोएल टाटा यांच्याकडे आली आहे.
कोण आहेत नोएल टाटा?
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे 66 टक्के भागीदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पेरेंट कंपनी आहे. नोएल टाटा हे गेल्या 40 वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य असून टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आहेत.