मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेला गती आली आहे. महायुतीतील जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, या भूमिकेवर भाजप हायकमांड ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सहा खासदारांबद्दल नकारात्मक अहवाल आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार, हे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भाजपच्या हायकमांडसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जागावाटपाचा तिढा सुटेल. तोपर्यंत या सहा खासदारांना उमेदवारीसाठी वाट पहावी लागणार आहे.
‘हे’ आहेत सहा खासदार…
भाजपकने केलेल्या सर्वेमध्ये काही विद्यमान खासदारांबद्दल जनतेमध्ये नकारात्मक भूमिका पाहायला मिळाली. ज्यामध्ये शिंदे गटाचे हातकणंगले येथील धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांची नावे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार बदलावेत, अशी अट अमित शाह यांनी शिंदे यांना घातल्याची माहिती मिळत आहे.
भाजपकडून काही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यास विरोध आहे. विद्यमान खासदारांच्या जागी इतरांना उमेदवारी देण्याची अट भाजपने घातली आहे. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला आहे. दरम्यान, याशिवाय चर्चा पुढे जाणारच नाही, अशी थेट भूमिका भाजपने घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना आता उमेदवार बदलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत होणाऱ्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
महायुतीत अजित पवार गटाकडून एकूण ९ जागा मागितल्या होत्या. प्रत्यक्षात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३ किंवा ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख नेते सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी देण्यास भाजपने जोरदार विरोध केला आहे. रायगडमध्ये सुनील तटकरेंऐवजी दुसरा उमेदवार द्या, अशी भाजपची सूचना आहे. त्यामुळे शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटातील विद्यमान खासदारांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे.