मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता आगामी विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा कंबर कसलेली दिसून येत आहे. शरद पवार गटाने याआधीच तीन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे. त्यानंतर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुणांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरुद्ध नवे चेहरे मैदानात असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले असून प्रमुख 20 विधानसभा मतदारसंघात तरुणांन मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये, हसन मुश्रीप यांच्या कागल, धनंजय मुंडेंच्या परळी, दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर, आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा दोन गटात फूट पडली तेव्हा 40 पेक्षा जास्त आमदारांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांसोबत महायुतीत सहभाग घेतला होता. लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला होता.