मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकीकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांनी हत्या होण्याआधी काही तासांपूर्वी डायरीत भाजपच्या एका बड्या नेत्याचं नाव लिहिलं होतं, असा जबाब झिशान यांनी पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या हत्या प्रकरणी अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या दिवशी बाबा सिद्दिकींच्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा दावा झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात केल्याचं बोललं जात आहे. बाबा सिद्दिकींना रोज डायरी लिहायची सवय होती. त्याप्रमाणे हत्येच्या दिवशी देखील डायरी लिहिली होती. यामध्ये मोहित कंबोज यांचं नाव असल्याचं झिशान यांनी म्हटलं आहे.
झिशान सिद्दीकी यांच्याकडून पोलिस जबाबात इतर बिल्डर्सप्रमाणे मोहित कंबोज यांचेही नाव घेत संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपपत्रात बिल्डर पृथ्वी चव्हाण, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, शाहिद बलवा, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या विकासकांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
तर वडिलांची हत्या वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बाबा सिद्धीकींच्या हत्येचा आणि पुर्नविकास प्रकल्पाचा कोणताही संबध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या बिष्णोई गँगकडून झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
हत्येचं कारण काय? मुख्य शुटरने सांगितलं..
पोलिसांनी आरोपपत्रात बाबा सिद्धीकी यांची हत्या सलमान खान याच्याशी असलेली जवळीकता यातूनच झाल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकींवर हल्ला करणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात सांगितलं की, कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोईने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर ‘दाऊद इब्राहिमशी संबंध आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग’ यावरून हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते.