मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होईल. पण त्याआधीच भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता तेच राज्याचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याचे समोर आले आहे. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार आहेत. तर रवींद्र चव्हाण त्याला अनुमोदन देतील. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत बहुमताने फडणवीसांचे नाव निश्चित केले जाणार आहे.