मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. तत्पूर्वी आदल्या रात्री मुंबईत महायुतीच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काल रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडल्याचे सांगितले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदं फायनल करा, त्यानंतर आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करु, असे अजित पवार यांनी भाजप नेतृत्त्वाला सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं कायम राहणार यासोबतच एकनाथ शिंदेना जितकी खाती मिळतील तितकीची खाती आम्हाला सुद्धा मिळावी, ही आमची भूमिका कायम असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने दिली आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून यंदा मंत्रिमंडळात जुन्याऐवजी नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गुरुवारी सकाळपासून लगबग दिसून येत आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून तत्पूर्वी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊन अजित पवारांचं अभिनंदन करत आहेत. आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची रीघ देवगिरी बंगल्यावर लागली आहे. दरम्यान, महायुतीच्या आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पुन्हा एकदा अमित शाह आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. यावेळी अमित शाह हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी काय बोलणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे. या बैठकीत गृहमंत्रीपदाबाबत काही चर्चा होणार का? हे बघणं रंजक ठरणार आहे.