मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सुरुवातीला बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन जणांनी गोळीबार केला अशी माहिती समोर आली होती. मात्र आता आरोपींची संख्या तीन नसून चार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण चार शूटर होते, त्यातील एक आरोपी हा बाबा सिद्दिकी यांची सर्व डिटेल्स तीन आरोपींना पुरवण्याचं काम करत असल्याचे समोर येत आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता बाबा सिद्दिकी हे आपला मुलगा आणि आमदार जिशान सिद्दिकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यलयात आले होते.
याचवेळी ही घटना घडली आहे. चौकशीमधून असं समोर आलं की आरोपींची एकूण संख्या चार होती. त्यातील एक आरोपी हा बाबा सिद्दिकी यांचं लोकेशन आणि इतर माहिती तीन आरोपींना पुरवत होता. बाबा सिद्दिकींवर एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यातील दोन गोळ्या या सिद्दिकी यांच्या छातीला लागल्या. तर आणखी एक जण या घटनेत जखमी झाला.
या घटनेनंतर हे तीनही शूटर पळून जात होते. मात्र दसरा असल्यानं अनेक ठिकाणी पोलीस तैनात होते. त्यातील दोघांना लगेच पकडण्यात आलं आहे. मात्र दोन आरोपी हे गर्दीचा फायदा घेऊन पोलिसांची नजर चुकवत फरार झाले.