मुंबई: पुण्याप्रमाणे मुंबईतून रुग्णालयाच्या हलगर्जीबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा वेळेत उपचार न केल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईत आणखी एका गर्भवतीचा बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. ही घटना तुर्भे येथे घडली. संगिता खरात असे या मृत महिलेचे नाव आहे. संगीता यांचा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
प्रसुतीच्या वेळी डॉक्टरांनी चुकीचे वैद्यकीय उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. संगिता खरात यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना महानगर पालिकेच्या रुग्णालयातून बाजूच्या खाजगी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता खरात यांच्या प्रसूती नंतर रक्त तपासण्यासाठी त्यांचे रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरात रक्तच नसल्याचे समोर आले. प्रसुतीवेळी रक्तस्त्राव होत होता पण डॉक्टरांकडून दुर्लक्ष झाले. त्यानंतर महिलेला मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून फोर्टिस रुग्णालयात भरीत करण्यात आले. मात्र महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, प्रसूती झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला असताना आणि महानगर पालिका कोट्यातून महिलेला फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले असताना देखील पुरेसे कागदपत्र नाहीत असे कारण देत रुग्णाच्या नातेवाईकांकडून बिलाची रक्कम भरण्याचा तगादा रुग्णालयाकडून लावण्यात आल्याचा प्रकारही घडला.
दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाने 2 लाख 63 हजार रुपयांचे बिल म्हणून मागितले. यातील 85 हजार रात्रीच अडमिट करताना भरण्यात आले होते. तर 1 लाख 5 हजार सकाळी भरण्यात आले. दरम्यान प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतरही 58 हजार रुपये भरण्यासाठी रुग्णालयाकडून नातेवाईकांकडे तगदा लावण्यात आला. या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी नवा मुंबई महापालिका प्रशासन आणि डॉक्टरांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनपा रुग्णालयातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.