मुंबई : बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरण संपूर्ण देशात गाजत आहे. त्यातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर राज्य ढवळून निघालं आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार आरोपी हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पोलिसांच्या स्वरक्षणार्थ त्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. परंतु याबाबत विरोधकांनी या एन्काऊंटरवर संशय व्यक्त केला आहे. सरकारला धारेवर धरून विरोधक प्रश्न विचारत आहेत.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील या एन्काऊंटरबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी हा एन्काऊंटर नसून हत्या असल्याचा आरोप केला असून या संदर्भात त्यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. एन्काऊंटरची घटना प्रत्यक्ष पाहणारा व्यक्ती म्हणून त्यांनी ही क्लिप सोशल मिडिया हँडल ‘एक्स’वर शेअर केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे संभाषण ऐकायला मिळत असून यामध्ये ५ मिनिट ११ सेकंदाचे संभाषण आहे. यामध्ये एक व्यक्ती त्या दिवशी नेमकं काय झालं याची माहिती देत असल्याचे ऐकायला मिळत आहे. ऑडिओमधील व्यक्ती कोण आहेत, हे समजू शकलेलं नाही. जाणूनबुजून ती हत्या करण्यात आली असं ऑडिओमधील व्यक्ती म्हणत आहे, तसेच, हत्येचे ठिकाणी देखील वेगळे होते असं समोरचा व्यक्ती म्हणत आहे.
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024
जितेंद्र आव्हाड यांनी द्विट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती.
दरम्यान, बदलापूरमधील एका नामांकित शाळेमधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने हे नाराधामी कृत्य केलं होतं. सदर प्रकार समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली होती. परंतु, पोलिसांच्या ताब्यात असतानाच अक्षय शिदिचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे.