ठाणे : बदलापूरमधील शाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता अक्षय शिंदेचा मृतदेह दहन न करता दफन करण्याची इच्छा त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली असल्याची बातमी समोर येत आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला जाणार आहे, असं अमित कटारनवरे यांनी सांगितलं आहे.
भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल परंतू मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळत नाही आहे. अक्षय शिंदेला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यामुळे कुटुंबाची भावना आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करून ठेवला जावा, अशी प्रतिक्रिया अमित कटारनवरे यांनी दिली आहे.
अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून द्यावी आणि यासंदर्भात महानगरपालिकेशी बोलावं असं सांगितलं आहे. आज कोर्टात सरकारी वकिलांकडून महानगरपालिकेशी बोलून दफनविधीसाठी जागा दिली जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याचं अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी सांगितलं आहे.