मुंबई : अभिनेता गोविंदा यांच्या पायाला मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागल्याची घटना घडली. या घटनेत गोविंदा हे जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जुहू पोलिसांनी सध्या संबंधित रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले असून ते या प्रकरणाचा तपास करत आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सुरुवातीला गोविंदा यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलमधून चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतर ही घटना नेमकी कशी घडली याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. यापैकी पहिल्या थिअरीनुसार अभिनेता गोविंदा हे त्यांच्या घरात रिव्हॉल्व्हर साफ करत होते. त्यावेळी अनावधानाने रिव्हॉल्व्हरचे ट्रिगर चुकून दाबले गेले आणि बंदुकीची गोळी गोविंदाच्या पायात शिरल्याचे बोलले जात आहेत.
याबाबत असं ही म्हटलं जातं, अभिनेता गोविंदा ही घटना घडली तेव्हा जुहू येथील बंगल्यावर एकटेच होते. ते पहाटे साडेपाच वाजता घाईगडबडीत बाहेर निघाले होते. त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील रिव्हॉल्व्हरचे लॉक ओपन होते. गाडीत बसताना रिव्हॉल्वरचा खटका चुकून दाबल गेला आणि बंदुकीची गोळी त्यांच्या पायात शिरली, असे सांगण्यात येते.
या प्रकारानंतर अभिनेता गोविंदा यांनी कोणाविरोधात तक्रार केलेली नसल्याची माहिती मिळत आहे. गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर खूप रक्त वाहत होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या पायावर काहीवेळापूर्वीच तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.