पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे. रामदास मारणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत मारणेसह १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मोहोळवर ५ जानेवारी रोजी पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला होता. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी त्याचा खून केला होता. खून प्रकरणात यापूर्वी दोन वकिलांना अटक केली आहे. खून प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत होते. आरोपी रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला नवी मुंबईतून अटक केली.
मुळशीतील हडशी गावात मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी गोळीबाराचा सराव केला होता. मध्यरात्री झाडाच्या बुंध्यावर पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून सराव केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पौड पोलीस ठाण्यात तपासासाठी सोपविण्यात आले आहेत.
साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड), नामदेव महिपती कानगुडे (वय ३४, रा. भूगाव आणि कोथरुड), सतीश संजय शेडगे (वय २८, रा. स्वप्नशिल्प अपार्टमेंट, माथवाडी फाटा, भूगाव), आदित्य विजय गोळे (रा. गोळे आळी. पिरंगुट), नितीन अनंता खैरे (रा. नंदनवन सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मोहोळच्या खुनाच्या कटात सामील होण्यास नकार दिल्याने पोळेकर आणि कानगुडे यांनी अजय सुतार यांनी डिसेंबर महिन्यात भूगाव परिसरात अजय सुतार याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोळेकर आणि कानगुडे यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुळशी तालुक्यातील हाडशी गावातील बोडकेवाडी येथील कालेकर यांच्या शेतातील जांभळाच्या झाडाच्या पोळेकर आणि साथीदारांनी जुलै महिन्यात बुंध्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हाडशी गावातील सत्यसाईबाबा ट्र्स्टच्या मागील बाजूस असलेल्या गोविंद उभे यांच्या मोकळ्या जागेत गोळीबाराचा सराव केला.
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पौड पोलिसांकडे दोन गुन्हे तपासासाठी सोपविण्यात आले आहेत.