मुंबई : आमदार रवींद्र वायकर हे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिल्याचे समजत आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
ईडीचा दबाव
रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरु आहे. रवींद्र वायकर यांना ईडी धमकावत आहे. त्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचे आजच राऊतांनी ट्विटमधून म्हटले होते.
गुप्त भेटीनंतर निर्णय?
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची गुप्तबैठक झाल्याचीही चर्चा होती. मात्र, आता त्या आमदाराच्या नावावरून पडदा उटला आहे. यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती. आता सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना घेऊन रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे.
कोण आहेत रवींद्र वायकर?
1992 मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा जोगेश्वरी भागातून मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. 2006 ते 2010 या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषवले होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर ते गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.