मुंबई : शिवसेन शिंदे गटातर्फे महाराष्ट्रभर आता भक्ती शक्ती संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ‘धर्मवीर अध्यात्मिक सेना’ संघटनेच्या वतीने २५ डिसेंबर पासून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाने या यात्रेला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा विचार एकत्रितरीत्या समाजापर्यंत घेऊन जात महाराष्ट्र हितासाठी काम करणे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मासमवेत महापुरुषांच्या विचारांच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा आलेख जनतेपर्यंत पोहोचवणे, हा या संवाद यात्रेचा मुख्य हेतू असल्याचे अध्यात्म सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.
आगामी लोकसभा शिवसेनेने आता महाराष्ट्रात भक्ती आणि शक्ती संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ती महाराष्ट्रात येत्या २५ डिसेंबरपासून २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. या संवाद यात्रेत महाराष्ट्रातील नानाविध भक्ती पंथ तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार यांच्यासह अनेकांशी संवाद साधला जाणार आहे. भक्ती-शक्ती संवाद यात्रा राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये विभागवार प्रवास करणार आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली.
पुढील वर्षी २८ फेब्रुवारी पर्यंत चालणारी ही अध्यात्मिक यात्रा पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विर्दभात जाणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत चालणाऱ्या या यात्रेची सांगता किर्तन, प्रवचनांनी होणार आहे. राजसत्ता व धर्मसत्ता एकत्र आल्यास रामराज्य निर्माण होईल हा संदेश घेऊन काढण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट हिंदूत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात असून आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.