मुंबई : शहरातील लालबाग परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. या गजबजलेल्या परिसरात बसने अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायव्हरशी वाद घालत बसचे स्टेअरिंग कसेही फिरवल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
हा अपघात रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडला. यामध्ये अनेक पादचारी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक बसून त्यांचेही मोठे नुकसान झाले.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) वाहतूक शाखा आहे. बेस्ट बसची मार्गिका क्रमांक 66 ही बस लालबागहून जात होती. बसचे ड्रायव्हर कमलेश प्रजापती (वय- 40) हे चालवत असलेली बस गणेश टॉकीजजवळ पोहोचली, मात्र तेव्हाच दत्ता मुरलीधर शिंदे (वय-40) याने जबरदस्तीने स्टेअरिंग व्हीलवर ताबा मिळवत ते डावीकडे फिरवले. मद्यधुंद प्रवाशाने केलेल्या या कृत्यामुळे बस चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींची धडक बसली.
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारांसाठी लगेचच जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना फ्रॅक्चरही झाल्याची माहिती मिळत आहे, तर इतर नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातास कारणीभूत ठरलेला, मद्यधुंद प्रवासी दत्ता शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. मद्यधुंद प्रवासी दत्ता शिंदे याची कसून चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार येण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.