मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल नुकताच लागला आहे. राज्यात महायुतीने घवघवीत यश संपादन केलं असून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. याबाबत दिल्लीत खलबतं सुरू आहेत. भाजप आणि नरेंद्र मोदी-अमित शहा जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, त्याला आमचा पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. तर भाजपचाच मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्यापही कुणाचच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. आता या चर्चांवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांवर लवकरच उत्तर मिळणार आहे. असं सूचक विधान देवेंद फडणवीस यांनी केलं आहे. पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि ते मंत्री कोण हे ठरवतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सगळ्या चर्चांना लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून लवकरच याबाबतचा निर्णय घेतील.
आधी मुख्यमंत्री ठरवला जाईल. त्यानंतर जे मुख्यमंत्री होतील ते मंत्री कोण असणार? याबाबत ठरवतील. त्यामुळे मुख्यमंत्री कोण असेल? याची वाट बघावी लागणार आहे. नंतर मंत्री कोण असतील, कुणाची नावे असतील ते समोर येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.