मुंबई : राज्यभर लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आत्ता मराठवाड्यात काँग्रेसला तर सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यातील नेते बसवराज पाटील आणि सोलापुरातील ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी आज २७ फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये हा प्रवेश पार पडला.
यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले, संपूर्ण देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. विकसित भारत म्हणून आज मोदींच्या नेतृत्वाच वाटचाल सुरु आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात त्यांच्यामागे मोठी शक्ती उभे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, त्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल, यासाठी फडणवीस साहेब नेतृत्व करत आहेत. याच विचाराने मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मी ४० वर्ष काँग्रेसमध्ये होतो. मी अतिशय प्रामाणिकपणे काम केले. आज त्याच निष्ठेने भाजपचे काम करत राहू. माझी कोणाबाबत तक्रार नाही, असे बसवराज पाटील म्हणाले.
बसवराज पाटील यांची कारकीर्द
लातूर जिल्ह्यातील मुरूम (ता. उमरगा) येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. १९९२ मध्ये त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. १९९५ मध्ये त्यांनी उमरगा विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. १९९९ च्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्रिपद दिले. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. २००९ च्या निवडणुकीपासून उमरगा मतदारसंघ राखीव झाला.
त्यामुळे पाटलांनी शेजारच्या औसा (जि. लातूर) मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. औसा विधानसभा मतदार संघातून बसवराज पाटील मुरूमकर यांना उमेदवारी देण्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपलं पक्षातील वजन वापरलं होतं. २०१९ आणि २०१४ च्या निवडणुकीतही ते औसा मतदार संघातून विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.