मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवापूर्वी मोठा निर्णय दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनणाऱ्या गणेश मूर्तींवरील बंदी उठवण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करून तिच्या विक्रीवरील बंदी उठवली असली तरी, या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे.
सुनावणी दरम्यान, राज्य सरकारने 3 आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करावी असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती बनवण्यासाठी आणि गणेशोत्सव मंडळांमध्येही अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा येणार नसल्याने अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पर्यावरण पूरक अटी लागू आहेत.

दरम्यान, पीओपी पासून तयार केलेल्या मूर्तीं विरुद्ध शाडूच्या मूर्ती हा वाद सध्या सुरू होता. विशिष्ट परिस्थितीत पीओपीला परवानगी देणे शक्य असल्याचा दावा राज्य सरकारने याआधीही उच्च न्यायालयात केला आहे. यासंबंधीत समितीने सादर केलेल्या शिफारशींचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवल्याचेही राज्यसरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले.








