मुंबई: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांच्या व्हॅनमधून नेत असताना शेजारच्या पोलिसाची बंदूक घेऊन स्वतःवर गोळी झाडत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत आरोपी अक्षय शिंदे आणि पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली अक्षय शिंदेनी नुकतीच पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी चौकशी दरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात देखील सादर करण्यात आला होता. या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली आहेत. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने नुकतीच दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर दिलेल्या या कबुलीजबाबाचे चित्रीकरणही झाले होते.