मुंबई: बदलापूर येथील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण हलक्यात घेऊ नका. सीआयडी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करीत नसल्याचे दिसत आहे, असे म्हणत या प्रकरणातील सीआयडीची भूमिका संशयास्पद आहे, असे कडक ताशेरे ओढले.
संशयित आरोपी अक्षय शिंदे (२४) याला ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. २४ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. तपासातील काही त्रुटी आणि आरोपीच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या दंडाधिकाऱ्यांना सादर केलेली कागदपत्रे लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गंभीर गुन्ह्याचा योग्यप्रकारे तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेत सीआयडीकडे वर्ग केला जातो. प्रत्येक प्रकरणाच्या तपासात निष्पक्षता असली पाहिजे. निष्पक्ष तपास व्हावा हा आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांना हक्क आहे. याची जाण ठेवा, अशी समज दिली.
यावेळी अक्षय शिंदे चकमक प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली असून, उर्वरित कागदपत्रे एका आठवड्यात सुपूर्द करण्यात येतील, असे सरकारी वकिलांनी सांगताच खंडपीठाने सीआयडीवर प्रश्नांची सरबत्ती केली. तुमच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेने ३ गोळ्या झाडल्या. पण त्यातील फक्त एक गोळी पोलिसांना लागली. मग बाकी दोन गोळ्या कुठे गेल्या? पोलीस अधिकाऱ्याला कोणती दुखापत झाली आहे? असे सवालही न्यायालयाने उपस्थित केले. या प्रकरणाची सुनावणी २० जानेवारी २०२५ रोजी निश्चत केली.