बदलापूर : येथील चिमुकल्यांवर अत्याचार करणा-या आरोपीचे वकीलपत्र कुणीही घेऊ नका, असे आवाहन कल्याणमधील वकील संघटनेच्या वतीने करण्यात आले. तसेच बदलापूर रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या अजामीनपात्र गुन्ह्यांविरोधात वकील आक्रमक झाले आहेत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
या अत्याचारानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचे कोणीही वकिलपत्र घेऊ नका, अशी विनंती कल्याममधील वकील संघटनेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याला पोलीसांनी कोर्टात हजर केले असता, 25 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी अक्षय शिंदे आहे तरी कोण?
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यातील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्याने त्यांच्या पालकांनी त्यांची विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. मुलींनी एक दादा माझ्या शू च्या ठिकाणी हात लावत असल्याचं मुलीनं सांगितल्यावर पालकांना मोठा धक्का बसला. शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यानं त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आले.