मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील तपासाला वेग आलेला दिसून येत आहे. बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेबद्दल आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी अक्षय शिंदेने शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आणखी एका चिमुकलीवर केलेल्या दुष्कृत्यानंतर त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय शिंदे याला सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या नवीन धक्कादायक खुलाश्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
शाळेतील चिमुकल्यांवरील अत्याचारचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येत आहे. याबाबतची सुनावणी 27 ऑगस्टला झाली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणात केवळ एकच नव्हे, तर अनेक त्रुटी झाल्या असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनीही पोक्सो कायद्यांतर्गत असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याचे दिसत नसल्याचे सांगत पोलिसांच्या कामावरही ताशेरे ओढले. पोक्सो कायद्यातील तरतुदीप्रमाणे ज्या व्यक्तीला गुन्हा घडल्याचे दिसते त्याने तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे असते. मात्र या प्रकरणात वर्ग शिक्षिकेनेही ते केलं नाही, त्यामुळे हा कायद्याचा भंग झाला असल्याचं कोर्टाने म्हटलं.