बदलापूर : बदलापूरात अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याची पोलीस कोठडी संपली होती. त्यानंतर पोलीसांनी त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केले होते. यावेळी न्यायमुर्तींनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कल्याण न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांपर्यंत म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे.
अक्षय शिंदे हा 15 दिवसांपूर्वी शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाला होता. त्याने दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. चिमुकलींनी आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली होती. त्यानंतर आई-वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी शाळा प्रशासन, पोलीस यांच्याकडून प्रचंड निष्काळजीपणा झाला होता.