67th Mahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज सकाळपासूनच बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जमले आहेत. तसंच आंबेडकरवादी विचारांचेही लोक जमले असून राज्य सरकारने विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे आंबेडकरी अनुयायी हे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरकारने राहण्याची व स्वच्छतागृहाची अतिशय उत्तम व्यवस्था केली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिसांची खबरदारी
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. दादर स्थानकातून चैत्यभूमीकडे जाणारा मार्ग योग्यप्रकारे समजण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक तसेच रेल्वे पोलिसासह आरपीएफ, गृहरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व इतर सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा दादर स्थानकात तैनात केला करण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.
भारतातील वर्ग लढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केलं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप 1928-1934 या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप सात वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला. 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेची स्थापना
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय,1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केलं.