मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल आरोपींच्या संपर्कात असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. मॅसेंजर अॅपचा वापर आरोपींशी संपर्क करण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी सुजीत सुशील सिंह याला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सुजीत सिंह कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी अनमोल बिष्णोईला आरोपी करण्यात आले आहे. अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सुजीत सिंह याच्या सांगण्यावरून या प्रकरणात अटक आरोपी नितीन सप्रे व राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 वर्षीय सुजीत सिंह याला अटक केली आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार सुजीत सिंहचा गँगस्टर अनमोल बिश्नोई याच्याशी संपर्क होता. पोलिसांच्या माहितीनुसार दोघे संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करत होते. पोलिसांना त्या अॅप्स वर बनवण्यात आलेल्या फेक अकाऊंटची माहिती देखील मिळाली आहे. याप्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमार गौतम, झीशान अख्तर आणि शुभम लोणकर फरार आहेत.