मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेतील सन 2023- 24 मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट तथा गुणवत्ता पूर्ण कार्याबद्दल विविध पदके, सन्मानचिन्हे जाहीर करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला होता. यावर्षीचे पुरस्कारांमध्ये राज्य स्तरावरून तीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा पदकाकरिता छत्रपती संभाजीनगरचे अधीक्षक संतोष झगडे यांची निवड करण्यात आली असून विशेष मोहीम पदक पुणे येथील अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट तपास पदकाकरिता ठाणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरीता त्यांना देण्यात येणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त स्तरावरून देण्यात येणाऱ्या विविध पदक, सन्मानचिन्हकरिता एकूण पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विशेष सेवा पदकाकरिता ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांची निवड करण्यात आली आहे. आयुक्त सन्मानचिन्हकरीता मुंबई शहर भरारी पथकाचे निरीक्षक प्रकाश काळे, महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अशोक तारू आणि जवान संवर्गात मुंबई येथील जवान संतोष शिवापुरकर, धुळे येथील जवान गोरख पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
ही पदके व सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचे मंत्री शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पुढील काळात असेच उत्कृष्ट काम करून अधिकाधिक पदके मिळविण्यासाठी शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.