मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मानखुर्दमध्ये काही रहिवाशांनी सोमवारी सायंकाळी रस्त्यावर तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे 10 ते 12 जणांना विषबाधा झाली व यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात घेता, सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नुकताच चिकन शॉरमा खाल्ल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभागाने बुधवारी एक सूचना जारी केली. मानखुर्दमध्ये ज्या भागात ही रस्त्यावरील अन्नपदार्थांची दुकाने होती त्या भागातील 15 बेकायदा फेरीवालेही महापालिकेने हटवले आहेत.
मानखुर्द येथील एका स्थानिक दुकानातून प्रथमेश भोकसे या 19 वर्षीय तरुणाचा मंगळवारी सकाळी चिकन शॉरमा खाल्ल्याने मृत्यू झाला, तर पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशाच एका घटनेत, 26 आणि 27 एप्रिल रोजी गोरेगाव पूर्वेतील रस्त्यावर चिकन शॉरमा खाल्ल्याने किमान 12 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबईतील नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने विविध धोरणे, योजना आणि अभियान पालिकेच्या माध्यमातून नियमितपणे राबविण्यात येतात. नेहमी आजारांची जनजागृती आणि उपाययोजना याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून नियमितपणे पाठविण्यात येते.
वारंवार वाढत जाणारे तापमान व त्यातून अन्न पदार्थावर होणारे परिणाम आणि अलिकडे घडलेल्या अन्न विषबाधेच्या घटनेच्या अनुषंगाने महानगरपालिका आरोग्य विभागाकडून मुंबईतील नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत.
यावेळी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना असे आवाहन केले आहे की, अनधिकृत विक्रेत्यांकडून पेय आणि खाद्यपदार्य खाण्याचे टाळावे. शक्यतो घरात शिजवलेले ताजे अन्न खा. याबाबत मुलांच्या पालकांनी दक्षता घ्यावी.