पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात (एमपीएससी) तर्फे ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या एकूण १६४ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत रत्नागिरीच्या अवधूत दरेकर याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, मुलींमध्ये साताऱ्याच्या सोनाली भिसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर मागासवर्गीय प्रवर्गातून यवतमाळच्या गजानन राठोड याने प्रथम क्रमांक पटकावला.
उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गातील शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कट ऑफ मार्क्स) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खेळाडू व इतर वर्गवारी मध्ये शिफारस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकालामध्ये तात्पुरत्यारीत्या समाविष्ट करण्यात आलेले आहे. या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी शासनाकडून करण्याच्या आधीन राहून ही शिफारस केली गेली आहे.
या परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्द्यांसंदर्भात, तसेच अन्य मुद्द्यांसंदर्भात विविध न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर केला गेला आहे. त्याचप्रमाणे अंतिम निकालात शिफारस पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.