उल्हासनगर : आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त जमीन मालकाच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांवरअट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याशिवाय, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्या साथीदारावर गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जमिनीच्या वादातून एकनाथ जाधव कुटुंबियाला भाजप आमदार गायकवाड यांच्यासह समर्थकांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती. अशी तक्रार मधुमती उर्फ नीता एकनाथ जाधव यांनी २ जानेवारीला रात्री साडे नऊ वाजता केल्यावर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारेख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल व मंगेश वारघेर या आठ जणांविरोधात अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला. यानंतर अवघ्या दिड तासात गोळीबाराची घटना पोलीस ठाण्यात घडली.
३१ जानेवारीला दुपारी दीड वाजता व २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता द्वारलीगावच्या वादग्रस्त जागेत प्रवेश करून जागेवरील कंपाऊंडचे पोल फेकून दिले. याप्रकरणी मे. फेअरडील डेव्हलपर्सचे भागीदार जितेंद्र पारीक यांच्या तक्रारीवरून २ फेब्रुवारी दुपारी शिवसेना कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या वादातून आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते. वादग्रस्त जागेवरून पोलिस ठाण्यात चर्चा सुरु असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे केबिन बाहेर जाताच वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमध्ये आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार राहूल पाटील याच्यावर गोळीबर केल्याची घटना घडली.