Asha Bhosle : मुंबई : भारतीय संगीत क्षेत्राचा एक सुवर्णकाळ संपला असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात दुःखाची लाट पसरली असून संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 12 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे स्वतः प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार होते. आई शेवंती या गृहिणी होत्या. पाच भावंडांमध्ये आशाताई तिसऱ्या क्रमांकावर होत्या. लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर अशा सर्वच भावंडांनी संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आशाताईंनी जवळपास सात दशके आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी 11 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली असून त्यात हिंदी, मराठी आणि बांगला अशा विविध भाषांचा समावेश आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासह 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारांनंतर त्यांचे धाकटे भाऊ हृदयनाथ मंगेशकर एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर येथे सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत गाण्यावर प्रेम करणाऱ्या या महान गायिकेच्या जाण्याने कला क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.







