मुंबई : लोकसभा निवडणुकीचं मतदान होत असताना मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी एका व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाख रुपयांची कॅश पकडली आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती.
या नाकाबंदीदरम्यान कॅश व्हॅन गाडी जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली असता पोलिसांनी ४ कोटी ७० लाख रुपये कॅश व्हॅनमधून जप्त केली. पोलिसांनी याची आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकारी यांनी त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला.
यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडीला आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आली, एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता? यासंदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.