मुंबई : महायुतीत नाराजी नाट्य चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. कॅबिनेट बैठकीत विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. त्यावर निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला अशी माहिती समोर येत आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यात वादावादी झाल्याचं दिसून आलं आहे. आपल्या खात्याला अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली. त्यावर निधी कुठून आणायचा, आता काय जमिनी विकायच्या का?असा प्रश्न अजित पवारांनी विचारल्याची माहिती आहे.
कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी?
गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी काय करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केला. त्यावरून अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे.
एकीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चांवरून ओढाताण सुरू असताना आता नेत्यांमध्येही खडाजंगी होऊ लागल्याचं चित्र आहे.
महायुतीमध्ये आलबेल नाही..?
लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात आगामी विधानसभेची तयारी सुरू झाली असून महायुतीने सत्ता आपल्याकडे राखण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. पण निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांआधीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याचं दिसून येत आहे.
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केक कापण्यात आला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं. काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार, त्यामुळे कोण मुख्यमंत्री होणार यावर चर्चा न करता कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.