मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या विधीमंडळ गटनेता निवडीसाठी 4 डिसेंबर रोजी मुंबईत बैठक पार पडणार आहे. त्यासाठी भाजपने निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या निवडीचे पत्र जारी केले आहे. पक्षाचे निरीक्षक उद्या सायंकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर 4 तारखेला भाजपच्या आमदारांची बैठक होऊन विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस झाले आहेत. मात्र, भाजपकडून अद्यापही विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आली नाही. गटनेता निवडीसाठी भाजपकडून निरीक्ष नेमले जाणार होते. मात्र, ते कधी नेमणार याची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून निरीक्षक म्हणून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे विधीमंडळ गटनेत्याची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. 4 तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी भाजप नेत्यांना मुंबईत बोलावले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. तर विजय रुपाणी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. दोघेही उद्या महाराष्ट्रात येणार असून त्यानंतर विधीमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक घेणार आहेत. या बैठकीतून सर्वानुमते भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. दरम्यान, 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे गटनेता निवड किंवा राज्यपालकांकडे सरकार स्थापनेचा दावा या सर्व प्रक्रिया 4 डिसेंबर पर्यंत कराव्या लागणार आहेत .