मुंबई : ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ साठी राज्यातील सर्व धर्मातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सोमवारी केले. भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या या योजनेत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे. पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी एकाच वेळी योजनेचा लाभ घेता येईल. प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा त्यात समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये असून हा खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्य आयकराता नसावा, अशा अटी-शर्ती आहेत.