मुंबई: राज्यात पावसाने हजेरी लावली की ठिकठिकाणी झाडेझुडपे वाढतात. पावसाळ्यातील या झाडाझुडपांच्या वाढीमुळे रस्त्याच्या कडेला, मैदानात तसेच डोंगराळ भागात साप, विंचूसारख्या विषारी सरपटणाऱ्या जीवांचा धोकाही वाढतो. यंदा ठाणे जिल्ह्यातही सर्पदंश झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. याच वेळी सर्पदंशाची लस उपलब्ध नसल्याने हाफकिनला अँटी स्नेक व्हेनम लसीच्या एक हजार मात्रांची ऑर्डर देऊन लसी मागवल्या आणि लस मिळाल्याने जवळपास १०० रुग्णांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
आपल्याकडे मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे चार विषारी साप प्रामुख्याने आढळतात. पावसाळ्यात झाडेझुडपे आणि घराजवळ असलेल्या कचऱ्यात, चपलांमध्ये ते आधार घेतात. यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्यावर वेळेत उपचार मिळणे गरजेचे असते. रात्रीच्या वेळेस या सापाचा संचार जास्त असतो. झाडेझुडपे, गवतातून चालताना हा साप दंश करतो. या सापाने केलेला दंश पटकन समजून येत नाही आणि साप चावलेल्या रुग्णाचा मृत्यू होतो.
सर्पदंशाच्या अनेक केसेस ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल होतात. पण अँटी स्नेक व्हेनम ही सर्पदंशाची मात्रा नसल्याने ठाणे सिव्हिल रुग्णालयाने हाफकिन महामंडळाशी संपर्क साधला आणि एक हजार लसीची ऑर्डर दिली. १ ऑगस्ट रोजी ही ऑर्डर पूर्ण केली. या लसीमुळे १०० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचले असल्याचे हाफकिन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अमित डोंगरे यांनी सांगितले.