मुंबई : बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्य पेटलेलं असताना आता बदलापुरातूनच मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथ येथील कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली भागात मंगळवारी संध्याकाळी कौटुंबिक वादातून घरातीलच व्यक्तीने दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत माथेफीरू वाहन चालकाच्या धडकेत दोन नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत.
आपल्याच कुटुंबाच्या वाहनाला दिली जोरदार धडक..
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडील बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या वाहनाने कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी वाहनाने घेवून जात होते. मात्र सतीश यांचा पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या रागातून सतीश याने आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग करत राज्य महामार्गावरील त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. तसेच या घटनेत रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांनाही सोबत फरफडत नेले.
त्यानंतर पुन्हा पुढे नेलेलं वाहन मागे वळून दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबाच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत समोरील वाहनामागे असलेले मोटर सायकलस्वार ओम चव्हाण व हर्ष बेलेकर यांना जोरात धडक बसून ते फॉर्च्यूनर गाडी खाली आल्याने जखमी झाले आहेत.
यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या प्रकरणी रात्री उशिरा आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.