मुंबई : अंजली दमानिया आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले वाक्युद्ध पुन्हा सुरू झाले. प्रवक्ते सुरज चव्हाण आणि राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी मानहानीची नोटीस पाठवली असून ‘याप्रकरणी आपण कायदेशीर मार्गाने शेवटपर्यंत लढू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
दमानिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चव्हाण यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले आहेत. ‘सुपारीबाज बाई’, ‘रिचार्जवर चालणारी बाई’, ‘कोणी अग्रवाल वकिलांकडून पैसे घेतले’, ‘त्यांच्या मुलांची नवऱ्याची सगळी माहिती उघड करणार’, ‘त्या ब्लॅकमेलर आहेत का?’ असे विचारल्यावर, ‘१०० टक्के’, अशाप्रकारचे अतिशय गंभीर, बेछूट, गलिच्छ आणि खालच्या दर्जाचे आरोप एका सुसंस्कृत, मूल्यनिष्ठ व्यक्तीबद्दल केले. याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असंही दमानिया म्हटले आहे.