मुंबई : पैसे, दागिने, मोबाईल चोरीच्या घटना नवीन नाहीत. आता चोरट्यांच्या नजरेतून अजगर, घोरपड, पाल, सरडा हे प्राणी देखील सुटत नसल्याचे उघडकीस येत आहे. शिवाजी पार्क येथील मरीन अॅक्वा झूमधून चक्क प्राण्यांची चोरी झाली आहे. सहा अजस्त्र अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा येथून चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याची माहिती मिळत आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्राणीसंग्रहालयातील (कथित) अनधिकृत बांधकामावर बीएमसीने सोमवारी कारवाई केली होती. त्यानंतर एक्झॉटिक अॅनिमल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप प्राणी संग्रहालय प्रशासनाने केला आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
प्राणी संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर प्राणी संग्रहालय चर्चेत आले होते. सध्या या प्राणीसंग्रहालयात ससा, कोकेटेल, मलार्ड डक्स, कार्पेट पायथन, बॉल पायथन, अर्जेंटिना टाग्यू घोरपड, ब्ल्यू टंग स्किंग ( साप सुरळी), एम्पेरोर विंचू, इग्वाना, बंगाल मार्बल मांजर, रेड आयड स्लायडर कासव हे प्राणी आणि पक्षी तसेच अॅलिगेटर गार, अरोवना, फ्लॉवर हॉर्न, परोट फिश, पिराना हे मासे आहेत.
‘मरीन अॅक्वा झू’ची ही जागा सध्या वाईल्ड लाईफ वाँडरर्स नेचर फाउंडेशनची अर्थात नंदकुमार मोघे यांच्या मालकीची आहे. नंदकुमार मोघे आयएएस ऑफिसर होते. ते महाराष्ट्र सरकार मध्ये वाईल्ड लाईफ ॲडव्हायझर, मुंबई महानगरपालिकेमध्ये वाइल्डलाइफ अॅन्ड झू अॅडवायझर, महाराष्ट्र सरकारच्या टायगर सफारीचे को चेअरमन अशा विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या मोघे यांचा मुलगा युवराज मोघे फाउंडेशन आणि प्राणी संग्रहालय सांभाळतो.