मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19 व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. एआरओ (असिस्टंट रिटंनीग ऑफिसर) आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक आहे.19 व्या राऊंडनंतर आमची मत मोजलीच नाही, असा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
काय म्हणाले अनिल परब?
अनिल परब म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. हा सर्व संशयास्पद निकाल आहे. 19 व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली. प्रत्येक फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली याची आकडेवारी दिली जाते. प्रत्येक राउंडनंतर 19 व्या फेरीपर्यंत हे सगळं व्यवस्थित सुरु होतं. पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारीची टॅली करतात. मग RO आकडेवारी फायनल करतात.
RO आणि उमेदवारचा प्रतिनिधी यामध्ये अधिक अंतर होतं. मतं मोजून झाल्यानंतर फॉर्म 17C भरून द्यायचा असतो. ज्यामध्ये आपल्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे द्यावं लागतं. पण फॉर्म अनेकांना दिले नाहीत. आमच्या टॅलीमध्ये 650 पेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. 650 मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या टॅलीमध्ये येत आहे. निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की, आम्ही निकाल जाहीर करतोय. मात्र, यामध्ये काहीच सांगण्यात आलं नाही.
पुढे बोलताना म्हणाले, निकालात गडबड वाटल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले तर दोन दिवसात देऊ असे आम्हाला सांगण्यात आले. पण नंतर हे फुटेज देण्यास नकार दिला. कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही असं ते आता सांगत आहेत. मतमोजणीवेळी मोबाईल वापरला, त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे. दहा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. या दहा दिवसात मोबाईल बदलले असा आमचा आरोप आहे. गुरव कोण आहे? अधिकाऱ्याने यांचा मोबाईल वापरला का? सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी यावेळी केली.