मुंबई : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावा, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी काढला आहे.
राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने याबाबत आदेश देण्यात आले. यात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत असल्याचे म्हटले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवले गेले आहेत.