मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं बोलललं जात आहे. यांच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना २ मार्चला बारामतीमध्ये जेवणासाठी बोलवल्यानंतर ही बैठक होत आहे. २ मार्च रोजी मुख्यमंत्री बारामतीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अशातच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी जेवण करण्यास निमंत्रण दिलं आहे.
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून खासदार आहेत. अजित पवार यांनी या जागेवरून उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. बारामती मतदार संघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट जवळपास निश्चित मानले जात आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय परिसरात आयोजित ‘नमो महारोजगार मेळावा’ या रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जाहीर निमंत्रण दिले आहे.