मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात एका नवऱ्याने बायको आणि मुलावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनाविरुद्ध घटस्फोट दिल्याच्या रागातून ॲसिड हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत निर्मल नगर पोलिसांनी पती इशरत शेख याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बायको अंजुम कॅटरिंगचं काम करते, तर पती इशरत चालक आहे. पती इशरत शेख याला पत्नी अंजुम शेख सोबत राहायचं होतं. मात्र पत्नीने त्याला त्याच्या इच्छेविरूद्ध घटस्फोट दिला होता. याचाच राग इशरत याच्या मनात होता. त्यामुळे त्याने पत्नी आणि मुलगा त्यांच्या घरात असताना दोघांवर ॲसिड फेकून फरार झाला होता. त्याला पोलिसांनी २२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे.
या घटनेत जखमी झालेले अंजुम शेख आणि मुलगा रईस शेख यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बायकोच्या पाठीवर पोटावर आणि हातावर, तर मुलाच्या पाठीवर ॲसिड पडलं होतं. दोघंही सध्या आऊट ऑफ डेंजर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे वांद्रे पूर्व परिसरात मोठी खळबळ उडाली होती.