मुंबई : आता भाजप सगळीकडे नंबर 1 पक्ष असणार आहे. भाजप आणि देवेंद्रजी मिळून भाजप सत्तेत आणणार असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. आज देशातील चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजप वरचढ ठरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीगड, या राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची सत्ता नसेल. त्यामुळे हिंदी बेल्टमधून काँग्रेस ‘आऊट’ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
भाजप आता इथून पुढे सगळीकडे नंबर 1 च पक्ष राहणार. महाराष्ट्रामध्येही देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे आणि भाजप देवेंद्र फडणवीसांच्याच मागे राहणार आणि भाजप आणि देवेंद्रजी मिळून भाजप आणणार. आजचा निकाल हा अपेक्षितच होता. आता इथून पुढे तुम्हाला सगळीकडे भाजपचं दिसेल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.
घर घर मोदी म्हटलं जायचं, पण आता ‘मन मन मोदी’ : एकनाथ शिंदे
घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता ‘मन मन मोदी’ असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा संपला असं काही लोक म्हणत होते. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
जनतेनं या निवडणुकांमध्ये मोदींना मोठी साथ दिली. मोदींची लोकांमध्ये असलेली लोकप्रियता कायम आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. राहुल गांधींनी परदेशात भारताला बदनाम केलं . मोदींना हरवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. 2024 मध्ये त्यांचे पानिपत होईल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.