अंबरनाथ : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे. अशातच आता बदलापूर घटनेची पुनरावृत्ती अंबरनाथमध्ये घडली आहे. शिक्षकानेच विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एक सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत येथील शिक्षक अश्लील चाळे करत असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीसांनी नराधम शिक्षकेला बेड्या ठोकल्या आहेत.
वांद्रापाडा परिसरातील संस्थेच्या शाळेत हा सर्व प्रकार सुरु होता. या शाळेतील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत इथला शिक्षक अश्लील लैंगिक चाळे करत होता. तसेच या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो या मुलांना ब्लॅकमेल देखील करत होता. त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी शाळेत जायला नकार दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी पालकांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली. अंबरनाथ पोलीसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्या शिक्षकाला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या घटनेने पालकवर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.