मुंबई : २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे आवश्यक आहे. असा आदेश मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे. सर्वत्र खूप चांगले मतदान व्हावे असे गगराणी यांचा उद्देश आहे. या आदेशाचे पालन न केल्यास निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा उपक्रम असणार आहे. सर्व लोकांना आणि कर्मचाऱ्यांना कोणतेही नुकसान न होता मतदान करता यावे यासाठी कोर्पोरेट, औद्योगिक आणि इतर कामाच्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी सुट्टी द्यावी असे भूषण गगराणी म्हणाले आहेत. या सूचनांमध्ये असे नमूद केले आहे की, ज्या कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे जमत नसेल, तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने किमान तीन ते चार तासांची सुट्टी देण्यात यावी.
मतदारांच्या मतदानाला चालना..
मतदारांच्या मतदानाला चालना देण्यासाठी भूषण गगराणी यांनी विविध उपक्रम राबवले आहेत, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना वेतन कपतीचा सामना न करता मतदान करता येईल याची खात्री करणे असा या निर्देशाचा समावेश आहे. हे उपक्रम नागरिकांच्या मतदानाच्या हक्काचे समर्थन करताना आवश्यक कार्ये करुन घेण्यासाठी आहेत. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३५(B) अंतर्गत, ज्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सार्वजनिक सुरक्षा किंवा कामकाज धोक्यात येऊ शकते. अशा कर्मचाऱ्यांना अपवाद लागू होतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीदरम्यान सार्वजनिक सुरक्षितता आवश्यकता यांच्यात संतुलन राखणे असा या मार्गदर्शक तत्त्वांचा मूळ उद्देश आहे.