नवी मुंबई : मनोज जरांगे पाटलांसह मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (२६ जानेवारी) रात्री तातडीने शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. या चर्चेनंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जवळपास ३ तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली आहे.
यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागे पाटील यांच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सरकारने आपल्या बहुतांश मागण्या मान्य केल्याचं शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं आहे. मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारकडून अंशत: मान्य करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांवरील राजकीय गु्न्हे मागे घेण्याचे आदेश काढले आहेत, अशी माहिती शिष्टमंडळाने जरांगे यांना दिली.