मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली असून या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. परंतु एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून त्यांनी मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घ्यावी अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
अजित पवार उद्या मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याबाबत गुप्त वार्ता विभागाने पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात धोकादायक हालचाली अनेक दहशतवादी संघटनांकडून होत असल्याने विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
गुलाबी रंगाची चर्चा..
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. मात्र या यात्रेपेक्षा सध्या जास्त चर्चा होते आहे ती म्हणजे अजित पवार यांच्या ‘गुलाबी राजकारणा’ची…या दौऱ्यादरम्यान जिथे अजित पवारांची सभा होणार आहे तेथील गुलाबी रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग अजित पवारांच्य जॅकेटवर, वाहनांवर, मंडपामध्ये सगळीकडे वापरण्यात आला आहे.