मुंबई : अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील यशानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी अजित पवार दावा करणार आहेत.
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे 3 आमदार विजयी झाले आहेत. अजित पवार पक्षाचे टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी दावा करणार आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. मात्र, आता अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रावदीची मान्यता रद्द
राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाला 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात. या निकषांची पूर्तता न केल्यामुळे निवडणुक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रावादी कॉंग्रेसची मान्यता रद्द करण्यात आली होती.
राष्ट्रवादीला 2014 नंतरच्या कामगिरीमुळे धोक्यात आला होता. 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात राष्ट्रवादीने निवडणुक लढवली होती. या निकालातील राष्ट्रावादीची कमजोरी विचारात घेऊन एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रावदीची मान्यता रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते.
काय आहेत निवडणुक आयोगाचे निकष?
- विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत
- लोकसभा निवडणुकीत कमीत कमी चार जागा मिळाल्या पाहिजेत.
- लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत
- या जागा कमीत कमी तीन राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत
- संबधीत पक्षाला कमीत कमी चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.