मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्याचवेळी अजित पवार गट आणि शिंद गट हे कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील, असा दावा करणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. आपल्यामुळे महायुतीत अंतर पडेल असे काही वागू नका, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच भेटीगाठी या कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना कधीही फसवणार नाही. आता माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही. हवे तर हे स्टॅम्पवर लिहून देतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार असून त्यासाठी संघटनात्मक काम करा. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. ही विचारधारा सोडायची नाही, त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. ज्येष्ठांवर टीका करायची नाही, पण कोणी आपल्या नेत्यांवर बोलले तर जशास तसे उत्तर द्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आपण कमळाच्या चिन्हावर नाही तर घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार आहोत. काही जण जाणीवपूर्वक सांगत आहेत की हे कमळावर लढणार आहेत. पण असे काही नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले