मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी सकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके अशी लढत होणार हे नक्की समजले जात आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पुण्यात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचवेळी लंके प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा अशी साद काहीच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखेही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहेत.